औरंगाबाद :- मराठवाडा ही सामाजिक क्रांतिकारी परिवर्तनाची भूमी आहे. याच भुमितील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शिक्षणाबरोबरच सामाजिक सलोखा आणि सहिष्णुता अबाधित राखण्यासाठी मार्गदर्शक काम करावे,असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण आणि पद्म पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन शनिवारी(दि.२२) करण्यात आले होते. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. विद्यापीठाच्या नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला.
उपस्थितांना संबोधित करतांना
माजी राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, महाराष्ट्र ही देशाच्या सामाजिक चळवळीची भूमि आहे. याशिवाय देशासाठी सामाजिक,आर्थिक योगदान देण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. भारतीय संस्कृतित या भूमिचे योगदान अतुलनीय आहे. संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सदैव शिक्षणाला प्राधान्य दिले. या देशासाठी योगदानात संविधानाची निर्मिती करतांना तत्कालिन विविध भुमिकांना छेदत आपण प्रथम आणि अंतिमतः भारतीय आहोत ही ठाम भुमिका स्विकारली. त्यांची ही भुमिका राष्ट्रभावना रुजविण्यासाठी उपयुक्त ठरली. त्यातूनच आजच्या देशाची जडण घडण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आपली भारतीय संस्कृती प्राचीन असतांनाच आपण जगात सर्वात जास्त युवकांचा देश आहे. या युवा शक्तीचे राष्ट्र विकसित करण्यासाठी योगदान घेण्यासाठी शिक्षण हेच महत्त्वाचे माध्यम आहे. त्यासाठी देशाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले आहे. या धोरणाचा उद्देश हा राष्ट्र विकसित करणे हाच आहे. शिक्षणाचे अंतिम ध्येय्य हे चांगला माणूस घडविणे हेच आहे. शिक्षण घेतलेला व्यक्ति तो ज्या क्षेत्रात कार्य करतो ते चांगले कार्य करतो. विद्यापीठाने आपल्या संशोधन कार्यातून राष्ट्राच्या उन्नत्तीला चालना द्यावी,असे आवाहनही त्यांनी केले. पद्म पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा सन्मान केल्याने विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून त्यांच्याकडूनही भविष्यात देशासाठी चांगले कार्य घडावे, अशा शुभेच्छा ही त्यांनी दिल्या.
माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते प्रथम विद्यापीठाच्या नुतनीकरण केलेल्या प्रवेशद्वाराचे लोकर्पण कोनशिला अनावरणाने करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.