पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मुलींच्या शिक्षणाने देशात मोठी क्रांती घडली आहे. एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रांत त्या अग्रेसर आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्यातील आणि देशातील विविध भागांतून पुण्यात येणाऱ्या मुलींची संख्या मोठी आहे. या मुलींच्या निवासाची व्यवस्था व्हावी, यासाठी सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज वसतिगृह उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, असे प्रतिपादन खासदार प्रकाश जावडेकर यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थिनींसाठी उभारण्यात येत असलेल्या वसतिगृहाचे भूमिपूजन खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, मुख्य वसतिगृह प्रमुख डॉ. वर्षा वानखेडे, कार्यकारी अभियंता विजय ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जावडेकर म्हणाले, पुणे विद्यापीठ ही माझी पहिली कर्मभूमी आहे. विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून, सिनेट मेंबर म्हणून जवळजवळ 15 वर्षे मी विद्यापीठात विविध विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्या अनुभवाचा मला पुढील राजकीय, सामाजिक जीवनात मोठा उपयोग झाला.
पुणे विद्यापीठाबद्दल माझ्या मनामध्ये आत्मियता आहे. म्हणून मी ही सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला, असेही ते म्हणाले. जावडेकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या या खासदार निधीतून उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहामुळे ५६० विद्यार्थिनींची कॅम्पसवर राहण्याची सोय होणार आहे, असे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले.