न्यूयॉर्क – युक्रेन आणि रशिया दरम्यान चर्चा सुरू झाल्याचे संयुक्त राष्ट्राने स्वागत केले आहे. काल प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की बेलारुस इथे सुरू झालेल्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीअखेर परस्परांच्या ताब्यातल्या प्रदेशातून नागरिकांसाठी सुरक्षित मार्ग, मानवतावादी हेतूने मदतीचे आदानप्रदान करु देण्याला उभय राष्ट्रांनी संमती दिली असल्याचे समजते आहे.
या चांगल्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने होईल अशी आशा संघटनेच्या राजकीय व्यवहार अवर महासचिव रोझमेरी डी कार्लो यांनी यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान युक्रेनविरूद्ध रशियाने युद्ध पुकारल्याच्या विरोधात सिंगापूर रशियावर निर्बंध लादणार आहे. रशियातल्या काही बॅंकांवर आर्थिक मर्यादा आणल्या जाणार असून निर्यातीवर नियंत्रण आणले जाईल. तसेच रशियाशी निगडित क्रिप्टोकरन्सी व्यवहारांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. रशियाच्या मध्यवर्ती बॅंकेला साहाय्य करण्यापासून अर्थसंस्थांना मज्जाव केला जाईल, असं वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.