पवनानगर (वार्ताहर) – पवन मावळातील शिवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकपदी पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच एकाच घरातील आई-वडील व मुलगा असे तिघेही विजयी झाले आहेत. मावळ तालुक्यातील मोठी सोसायटी म्हणून शिवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची ओळख आहे.
ही निवडणूक रविवारी (दि. 5) झाली. या सोसायटीत निवडणुकीसाठी शिवणे, मळवंडी ढोरे, सडवली, ओझर्डे, आढे येथील सभासद शेतकऱ्यांनी मतदान केले. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. के. निखारे यांनी काम पाहिले.
शिवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीवर 9 संचालक निवडून आणत ग्रामविकास शेतकरी सहकार पॅनलच्या माध्यमातून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
भाजपने ही सहकारी निवडणूक अतिशय वर्चस्वाची बनविली होती. कारण ही निवडणूक एका अर्थाने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ लढत होती. भाजपाची मावळात होत असलेली गळती थांबविण्यासाठी व आगामी निवडणुकांच्या संदर्भात भाजपासाठी हा विजय महत्त्वाचा मानला जात आहे.
भाजप पुरस्कृत ग्रामविकास शेतकरी सहकार पॅनेलचे एकूण 9 उमेदवारांची संचालकपदी निवड झाली असून, यामध्ये एकनाथ टिळे, धनंजय टिळे, गुलाब घारे, तानाजी कारके, शंकर देशमुख, बाळासाहेब रसाळ, बाळासाहेब गायकवाड तर महिला प्रतिनिधी माधुरी पडवळ, सावित्रीबाई टिळे यांची संचालकपदी निवड झाली आहे. तर राष्ट्रवादी पुरस्कृत श्री भैरवनाथ परिवर्तन शेतकरी विकास पॅनलचे एकूण 4 उमेदवारांची संचालकपदी निवड झाली.
यामध्ये मारुती चौधरी, तबाजी म्हस्के, निवृत्ती सुतार व बिनविरोध निवड झालेले मारुती म्हसुडगे यांची निवड झाली आहे. सोसायटीच्या एकूण 13 जागांसाठी निवडणूक झाली. यातील 1 जागा ही अगोदर बिनविरोध निवड झाली होती. या निवडणुकीनंतर भाजप पुरस्कृत पॅनेलने गेल्या 40 वर्षांपासून शिवणे सोसायटीत वर्चस्व प्रस्थापित केले असून, विजयानंतर गावांमध्ये भंडाऱ्याची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.