पौड -मुळशीत पूर्णत्वाकडे न गेलेल्या पुणे – कोलाड रस्ता समस्येच्या विळखेत असताना आज अचानक या रस्त्यावर डांबराने खड्डे बुजवण्याचे काम चालू असलेले दिसून येत आहे. पौड येथे केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांचा जाहीर सार्वजनिक कार्यक्रम आहे. यासाठी ते पौडला येत आहेत. त्यांच्या येण्याने अचानक खड्डे बुजवले जात असताना मुळशीकर नागरिक म्हणू लागले, मंत्री येता दारा, खड्डे बुजवतात भरा भरा!
पुणे – कोलाड रस्त्यावर अर्धवट कामामुळे पुणे – कोलाड रस्त्यावर 64 जणांचा बळी गेला. याला सर्वस्वी ठेकेदार जबाबदार असूनही त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. खासदार सुप्रिया सुळे तसेच पत्रकारांनीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. तरीही रस्ता पूर्णत्वास गेला नाही. अनेकदा विनवण्या करूनही खड्डे भरण्यास टाळाटाळ केली, ते भरलेच नाहीत. मात्र केंद्रीय मंत्री मुळशीत येणार असल्याने अचानक बुजवले गेलेले खड्डे पाहून केंद्रीय मंत्र्यांनी मुळशीत सारखे दौरे केल्यास रस्ता लवकर पूर्ण होईल असे मुळशीकर जनता म्हणत आहे.
पुणे-कोलाड रस्त्यासंदर्भात 12 तारखेला मिटिंग असून रस्त्याबाबत अंतिम भूमिका घेतली जाणार आहे. संबंधित ठेकेदार ऐवजी नवीन ठेकेदार घेतला जावा का, यावर त्या मीटिंगमध्ये चर्चा केली जाणार आहे.
– श्रुती नाईक,एमएसआरडीसी अधिकारी