नगर-करमाळा महामार्गाच्या प्रस्तावित कामाचे भूमिपूजन
चारपदरी रस्त्याचे दोन टप्प्यांत होणार काम
नगर – नगर-करमाळा महामार्ग, शहर बाह्यवळण रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ येत्या शनिवारी (दि. 2) होत असून, त्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर येत आहेत.
नगर शहराबाहेरील बाह्यवळण रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. बाह्यवळण रस्ता चारपदरी होणार असून, त्यासाठी सुमारे साडेनऊशे कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. तर नगर-करमाळा महामार्ग दोनपदरी आहे. हा महामार्ग आता चारपदरी करण्यात येणार आहे. सोलापूरपासून तर करमाळापर्यंतच्या महामार्गाचे चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे.
आता नगर ते करमाळा या टप्प्याचे मार्गाचे चारपदरीकरण दोन टप्प्यात करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून 980 कोटी व 1 हजार 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शहर बाह्यवळण व नगर-करमाळा महामार्ग ही दोन्ही कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत होत आहे. त्यासाठी शनिवारी एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचे जय्यत नियोजन सुरू आहे.
या दोन्ही कामांचा शुभारंभ केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील विकासकामांच्या उदघाटनाप्रसंगी गडकरी यांनी अनेक रस्त्यांची कामे केली जातील. त्यासाठी मोठा निधी दिला जाईल, असे सांगितले होते. आता नगरसाठी ते काय घोषणा करतात, याची उत्सुकता आहे.