indian idol news : इंडियन आयडलचा स्पर्धक निघाला चोर; दिल्ली पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई – सोनी टेलिव्हजन वरील प्रसिद्ध सिंगिंग रिऍलिटी शो ‘इंडियन आयडल’ने आजवरच्या सर्वच सिंगिंग कार्यक्रमांचे रेकॉर्ड मोडले आहे. इंडियन आयडलचे आजवरचे सर्वच सिझन हिट गेले आहेत. आतापर्यंतच्या सर्वच सिझन मधील सगळ्याच स्पर्धकांच्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे.
मात्र, दोन दिवसांपासून इंडियन आयडल एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. 2008 मधील इंडियन आयडल 4 च्या सिझन मधील एका 28 वर्षीय स्पर्धकाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. ‘सूरज’ उर्फ फायटर असे या आरोपीचे नाव असून, दिल्लीमधील मोती नगर परिसरातून सूरजला ताब्यात घेतले आहे.
मिळालेली माहिती अशी कि, दिल्लीमधील मोती नगर परिसरात पोलीस तपास करत होते. त्यावेळी त्यांना एक संशयीत व्यक्ती गाडी घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी त्याला पाहिले आणि थांबून त्याची चौकशी केली. तेव्हा त्या व्यक्तीने गाडी किर्ती नगर परिसरातून चोरी केल्याची माहती समोर आली.
तसेच चौकशी दरम्यान आरोपीने उत्तर दिल्लीमधील काही परिसरातून मोबाईल फोन आणि अडीच किलो सोने चोरल्याची कबूली दिली. त्याचबरोबर चाकू आणि बंदूकीचा धाक दाखवून काही मोटारसायकल चोरी केल्याची देखील कबूली दिली. या व्यतिरिक्त सूरज आणखी 100 प्रकरणांमध्ये सहभागी असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.





