नवी दिल्ली: करोनाच्या विषाणूंना रोखण्यासाठी पापड खाण्याचा सल्ला देणारे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ते अवजड आणि संसदीय कामकाज खात्याचे राज्यमंत्री आहेत.
मी ठिक आहे. मात्र वैद्यकीय सल्ल्यानुसार एम्स रुग्णालयात दाखल झालो आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असे ट्विट त्यांनी केले आहे. ते राजस्थानातील बिकानेर येथून लोकसभेवर निवडून आले आहेत.
पापड खाल्ल्याने शरीरात करोनाच्या अँटीबॉडीज तयार होतात, असे सांगणारा त्यांचा व्हिडिओ जुलै महिन्यात व्हायरल झाला होता. आत्मनिर्भर भारत योजनेत पापड उत्पादकांनी पुढे यावे आणि करोनाच्या अँटिबॉडिज तयार करून करोनाच्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहनही करून हे पापड करोनाच्या लढ्यात उपयुक्त ठरतील असेही ते म्हणाले होते.