कोलोंबो, (श्रीलंका): श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान म्हणून महिंदा राजपक्षे यांनी आज शपथ घेतली. निवडणूकीत त्यांच्या कुटुंबीयांचे प्राबल्य असलेल्या पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाल्याने शतकभर जुन्या बौद्ध मंदिरात त्यांच्या शपथविधीचा सोहळा झाला.
श्रीलंकेचे माजी अध्यक्ष आणि श्रीलंका पीपल्स पार्टीचे नेते असलेल्या राजपक्षे यांना त्यांचे बंधू आणि विद्यमान अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनीच पंतप्रधान म्हणून शपथ दिली. या प्रसंगी बौद्ध भिक्खू, उच्चपदस्थांचे प्रतिनिधी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची मोठी गर्दी या बौद्ध मंदिरात झाली होती.
5 ऑगस्ट रोजी झालेल्या निवडणूकीत श्रीलंका पीपल्स पार्टीला दोन तृतीयांश बहुमत मिळाले.
225 सदस्यांच्या संसदेमधील राजपक्षे यांच्या पक्षाने 145 आणि सहकारी पक्षांच्या बरोबर मिळून एकूण 150 जागांवर विजय मिळवल्या आहेत. या बहुमतामुळे श्रीलंकेच्या राज्यघटनेमध्ये दुरुसी करण्याचा अधिकारही राजपक्षे यांच्या सरकारला प्राप्त झाला आहे. त्यामुळे श्रीलंकेतील राजकारणावरील आपली पकड अधिक मजबूत करणे राजपक्षे यांना सहज शक्य होणार आहे.
भारताचे श्रीलंकेतील उच्चायुक्त गोपाल बागलेय यांनी शनिवारी राजपक्षे यांची भेट घेऊन निवडणूकीतील विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
राजपक्षे यांच्या राजकीय कारकिर्दीला जुलै महिन्यात 50 वर्षे पूर्ण झाली. वयाच्या 24 व्या वर्षी 1970 साली ते सर्वप्रहम संसदेमध्ये निवडून गेले होते. यानंतर दोन वेळेस ते श्रीलंकेचे अध्यक्ष म्हणूनही निवडले गेले होते. एप्रिल 2004 ते नोव्हेंबर 2005 मध्ये ते पंतप्रधान झाले. तर 2018 मध्ये 52 दिवसांसाठी ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. नोव्हेंबर 2019 पासून 5 ऑगस्ट 2020 दरम्यानही ते श्रीलंकेचे पंतप्रधान होते.
पंतप्रधान म्हणून चौथ्यांदा आपल्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर “श्रीलंकेच्या जनतेने मला पुन्हा एकदा सेवेची संधी दिल्याबद्दल मी भारावून गेलो आहे.’ असे ट्विट राजपक्षे यांनी केले आहे. जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासातूनच आपल्याला देशाची सेवा करण्याची प्रेरणा मिळेल. आपल्या कार्यकाळामध्ये श्रीलंकेचा वेगवान प्रगतीचा प्रवास सुरू राहिल, याकडे आपण लक्ष देऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.
श्रीलंकेचे 13 वे पंतप्रधान म्हणून कोलोंबोचे उपनगर असलेल्या केलानियातील राजमहा विहारया या बौद्धमंदिरात सकाळी 9 वाजून 28 मिनिटांच्या शुभमुहुर्तावर राजपक्षे यांनी शपथ घेतली. हे बौद्धमंदिर 2,500 वर्षांपूर्वीचे आहे. श्रीलंकेतील सत्ताबदलांना ते नेहमीच साक्षीदार राहिले आहे.