नागरिकांचा विरोध : पोलीस बंदोबस्तात झोपड्या, टपऱ्या, अनधिकृत बांधकामेही हटविली
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाठोपाठ आता प्राधिकरणाने देखील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु केली आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने गेल्या आठवडाभरात सुमारे 250 झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. वाकड, रावेत आणि पेठ क्रमांक 12 येथील झोपड्यांवर प्रामुख्याने कारवाई केली आहे. या कारवाईला नागरिकांनी विरोध केला. मात्र, पोलीस बंदोबस्तात कारवाई पूर्ण करण्यात आली. त्याशिवाय, काही अनधिकृत बांधकामे, दुकाने आणि टपऱ्या यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे.
प्राधिकरण संपादित जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत. ही अतिक्रमणे हटविण्याचे मोठे आव्हान प्राधिकरण प्रशासनासमोर आहे. ही अतिक्रमणे हटवून विकासकामे करण्याचे नियोजन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. त्यानुसार रावेत येथील ईशानी गार्डनजवळ असलेल्या 60 ते 70 झोपड्या पाडण्यात आल्या. पेठ क्रमांक 12 येथील तब्बल 150 झोपड्यांवर गुरूवारी (दि. 5) कारवाई करण्यात आली. तर, वाकड, सर्व्हे क्रमांक 210 येथील 40 झोपड्या हटविण्यात आल्या आहेत.
चिंचवड, सर्व्हे क्रमांक 137, 138 येथे दुकानाचे सुरू असलेले बांधकाम थांबविण्यात आले. तसेच, झालेले बांधकाम काढून घेण्यात आले आहे. वाल्हेकरवाडी येथील धर्मराज चौक ते गुरूद्वारा चौक दरम्यान केलेल्या कारवाईत रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या चार टपऱ्या पाडण्यात आल्या. पेठ क्रमांक 29, जाधववस्ती, सर्व्हे क्रमांक 194 येथील 21 हजार 527 चौरस फुट क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. प्राधिकरणाकडून सहा अनधिकृत होर्डिंग्ज देखील हटविण्यात आले आहेत.
अनधिकृत बांधकामांचे “पीक’
प्राधिकरण क्षेत्रातील वाल्हेकरवाडी, थेरगाव, रहाटणी, प्राधिकरण आदी भागांमध्ये अनधिकृत बांधकामांचे पीक चांगलेच फोफावले आहे. मंजूर चटई क्षेत्र निर्देशांकापेक्षा (एफएसआय) जादा एफएसआय वापरून दुमजली, तीनमजली बांधकामे करण्यात आली आहेत. त्यातही विधानसभा निवडणुकांच्या काळात नव्याने झालेल्या अनधिकृत बांधकामांचे प्रमाण जास्त आहे. प्राधिकरण प्रशासनाने संबंधित अनधिकृत बांधकामांचे व्हिडीयो शूटींग करून ठेवलेले आहे. त्यांच्यावर पुरेसा पोलिस बंदोबस्त मिळाल्यानंतर कारवाई केली जाणार आहे. त्याशिवाय, निवडणूक काळात झालेल्या ज्या बांधकामांबाबत प्रामुख्याने नागरिकांकडून तक्रारी आलेल्या आहेत, त्यांच्यावर प्राधान्याने कारवाईचे नियोजन आहे.