लाहोर :- वर्ल्ड कप 2023 मधील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानच्या क्रिकेटमध्ये मोठ्या बदलांचा काळ सुरू आहे. बाबर आझमचा संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरला होता आणि देशभरात चौफेर टीका झाल्यानंतर बाबर आझमने सर्व फॉरमॅटमधील संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) शान मसूदची कसोटी कर्णधार आणि शाहीन शाह आफ्रिदीकडे T20 फॉरमॅटचे कर्णधारपद सोपविले.
एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अत्यंत सुमार कामगिरी केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आणखी काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार त्यांचा माजी वेगवान गोलंदाज उमर गुल व फिरकी गोलंदाज सइद अजमल यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
39 वर्षीय उमर गुलने पाकिस्तानसाठी 47 कसोटी, 130 एकदिवसीय आणि 60 टी-20 सामने खेळले आहेत. पाकिस्तानच्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या गुलने कसोटीत 163, एकदिवसीय सामन्यात 179 आणि टी-20 मध्ये 85 विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे, फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक सईद अजमल यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास, संशयास्पद गोलंदाजी अॅक्शनमुळे त्याच्यावर बंदी घातल्याने त्याची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली. 46 वर्षीय सईदने पाकिस्तानसाठी 35 कसोटी, 113 एकदिवसीय आणि 64 टी-20 सामने खेळले. कसोटीत 178, एकदिवसीय सामन्यात 184 विकेट आणि टी-20मध्ये 85 विकेट्स त्याच्या नावावर आहेत.
ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या मालिकेपूर्वी गुल व हाफीज संघाशी जोडले जाणार आहेत. पाकिस्तानचा संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका तर त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे.
🚨 Umar Gul and Saeed Ajmal have been appointed as the Fast Bowling and Spin Bowling Coaches, respectively, for the Pakistan Men’s Team
Read more ➡️ https://t.co/0rPdPWlvGm pic.twitter.com/FB4sak7sFW
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 21, 2023
विश्वकरंडक स्पर्धेतील अपयशी कामगिरीनंतर इंझमाम उल हक यांना निवड समितीच्या प्रमुख पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता त्यांच्या जागी वहाब रियाजची निवड करण्यात आली आहे. तसेच क्रिकेट संचालकपदी महंमद हाफीज यांना नियुक्त करण्यात आले आहे.