Uma Bharti : अखेर माजी मुख्यमंत्री उमा भारती यांची मध्यप्रदेश विधासभा निवडणूक प्रचारात एन्ट्री झाली आहे. त्यांनी हिमालयात जाण्याच्या बेत रद्द केला असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवार 9 नोव्हेंबरपासून त्या निवडणूक प्रचारालाही सुरुवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. उमा भारती यांचा निवडणूक प्रचार सांची येथून सुरू होणार आहे. आता उमा भारती निवडणूक प्रचार सुरू करण्याआधीच सक्रिय झाल्या आहेत. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचा तीर्थ दर्शन योजनेवरील दावाही त्यांनी चुकीचा असल्याचे म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री उमा भारती सिलवानी येथील बाम्होरी आणि सागरच्या सुर्खी येथेही निवडणूक रॅली घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, त्याआधी उमा भारती यांनी प्रचाराला नकार देत हिमालयात जाण्याची घोषणा केली होती. भाजपच्या स्टार प्रचारक यादीत त्यांचे नाव नसल्याने त्याची जाहीरपणे नाराजीदेखील व्यक्त केली होती.पण मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आपल्याला प्रचारासाठी ज्याठिकाणी बोलावतील त्याठिकाणी आपण हजर राहू असे उमा भारती म्हणाल्या होत्या.
काही दिवसांपूर्वी उमा भारती यांनी ट्विट करून ललितपूर रेल्वे स्थानकावर डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे झाल्याचे सांगितले होते. झाशीत फिजिओथेरपी सुरू झाली असून यात काहीच सुधारणा होत नसल्याने झाशीतच एमआरआय करण्यात आला. डॉक्टरांच्या सूचनेनुसार, मी भोपाळला परतत आहे. उपचार, फिजिओथेरपी, औषधे आणि सुमारे 3 महिने बेड रेस्ट करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले आहे असे म्हटले होते.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा तीर्थ दर्शन योजनेवरील दावा खोटा ठरवून उमा भारती यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, “केजरीवाल जी अति तणाव आणि दबावामुळे कंटाळले आहेत, त्यांची स्मरणशक्ती कमकुवत झाली आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना माझे थोरले बंधू श्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशात प्रथम सुरुवात केली होती.” असे त्यांनी म्हटले.
त्यासोबतच उमा भारती यांनीही आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे. 2019 ची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही, पण आगामी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवायची इच्छा आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.