Ujjain Atrocities Case : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार करून तिला अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकून दिले होते. यानंतर पीडित मुलीने मदतीसाठी तब्बल ८ किलोमीटर पायी प्रवास केला. याबाबतचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या बलात्कार प्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी भरत सोनी नावाच्या रिक्षाचालकाला अटक केली आहे. तसेच अन्य तिघांना ताब्यात घेतले आहे.
आरोपी भरत सोनीचे वडील राजू सोनी यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्यांनी या घृणास्पद कृत्यांमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पीडितेच्या जागी माझी मुलगी असती, तर मीही तेच बोललो असतो. असे गुन्हे करणारे जगण्याच्या लायकीचे नाहीत. मग तो माझा मुलगा असो वा इतर कुणाचाही, असा गुन्हा करणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यांना फाशी किंवा गोळी मारली पाहिजे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया राजू सोनी यांनी दिली आहे.
पुढे बोलताना राजू सोनी यांनी, “उज्जैन येथील घटनेबद्दल मी बातम्यांमधून ऐकलं होतं. काल पोलिसांनी माझ्या मुलाला अटक केली. तत्पूर्वी मी माझ्या मुलाशी (भरत सोनी) या घटनेबद्दल बोललो होतो. पण तो बेफिकीर दिसत होता. त्याच्या दैनंदिन जीवनात जणू काहीच घडलं नाही, असं तो वागत होता. त्यानेच मला विचारलं, हे कुठे घडले? त्यावर मी म्हणालो, उज्जैनमध्ये”.त्यावर तो मला काहीच बोलला नाही” असे म्हटले.
त्यासोबतच “आता पोलिसांनी त्याला आरोपी बनवलं आहे, पण सत्य नंतर बाहेर येईलच. तो माझा मुलगा आहे, त्यामुळे मी त्याला साथ देईन. पण कुणाच्या मनात काय सुरू आहे, याला आपण नियंत्रित करू शकत नाही. त्याने हे कृत्य केलं नसेल, असं मला वाटतंय. परंतु जर त्याने हे केलं असेल तर त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. पोलिसांनी त्यांना गोळ्या घालायला हव्यात,” असेही राजू सोनी म्हणाले.