पुणे –सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात “नेट’ यावर्षीच्या जूनच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात घेतली जाणार असल्याची माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी सोमवारी ट्विटद्वारे दिली.
“नॅशनल टेस्टिंग एजन्सी’द्वारे (एनटीए) यूजीसी-नेट घेतली जाते. अद्याप “नेट’च्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. या परीक्षेकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. अशा स्थितीत “यूजीसी’चे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी जूनमध्ये परीक्षेचे सुतोवाच केल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. “एनटीए’कडून तारखा निश्चित केल्यानंतर अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध होणार असल्याचे कुमार यांनी नमूद केले.
“नेट’ वर्षातून दोनवेळा घेतली जाते. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर पडली आहे. डिसेंबर 2021 आणि जून 2022 च्या विलीन झालेल्या चक्रांसाठी पुढील “यूजीसी नेट’ जून 2022 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी करोनामुळे “यूजीसी नेट’ डिसेंबर 2020 आणि जून 2021 सत्र परीक्षा एनटीएने विलंबाने आयोजित केल्या होत्या. “एनटीए’ने 20 नोव्हेंबर 2021 ते 5 जानेवारी 2022 या कालावधीत दोन्ही सत्रांच्या परीक्षा तीन टप्प्यांत घेतल्या होत्या.