Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष तयारी लागले आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (MVA) मित्रपक्षांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र अद्यापही जागा वाटपाचा पेच सुटला नाही. यातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अमोल कीर्तीकर यांची मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.
चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा पक्षबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. यादरम्यान त्यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरेंनी मुंबईत शिंदे गटावर पहिला मोठा डाव टाकत उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे अमोल कीर्तीकर यांचे वडील गजानन कीर्तीकर सध्या शिंदे गटात आहे. सध्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून गजानन कीर्तीकर हे शिंदे गटाचे खासदार आहेत.
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात बाप विरुद्ध बेटा अशी लढत होणार आहे. या मतदार संघावर गजानन कीर्तीकर यांचे वर्चस्व आहे. त्यांनी 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे गुरुदास कामत यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2019 मध्ये संजय निरुपम यांचा यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.
उद्धव ठाकरे काय म्हणाले? Lok Sabha Election 2024|
दरम्यान, अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, अमोल कीर्तीकरला तुमच्याकडे दिला. जबाबदारी तुमची आहे हे लक्षात ठेवा. मी प्रचाराला येणार नाही, थेट विजयी सभेला येणार असल्याचं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं आहे. अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
हेही वाचा:
मराठा आरक्षण आंदोलनामध्ये नोंदवलेले गुन्हे मागे घ्या; सकल मराठा समाजाची मागणी