मुंबई – मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणाची सर्वत्र चर्चा झाली होती. त्यानंतर आता या प्रकरणावर आणखी एक माहिती समोर आली आहे. संदीप देशपांडे यांच्यावर अशोक खरात यांनी हल्ला केल्याचा उल्लेख चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केल्याने उद्धव ठाकरेंची सहानुभूती मिळवण्यास मदत होईल, असे खरात याला वाटत होते. त्यातून हा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अशोक खरात आणि इतर आरोपींवर गुन्हा दाखल केला.
या प्रकरणातील निलेश पराडकर फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. उद्धव ठाकरे परत सत्तेत आल्यास आपल्याला बक्षीस देतील म्हणून महाराष्ट्र राज्य माथाडी आणि कामगार सेनेच्या अशोक खरात याच्याकडून संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. ज्यावेळी संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला होता. तेव्हा स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
नेमकं काय घडले?
मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे हे3 मार्च शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी चार अज्ञातांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला होता. क्रिकेटमधील स्टम्प्सने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या चारही व्यक्तींनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. संदीप देशपांडे यांना थोडा मार लागला आहे. या हल्ल्याची माहिती समोर आल्यानंतर मनसैनिकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला होता.