मराठा आरक्षणासाठी उदयनराजे ऍक्‍शन मोडमध्ये

सर्वपक्षीय बैठकीसाठी पुढाकार : ठाकरे, पवार, फडणवीस सहभागी होणार

सातारा – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन मराठा आरक्षणप्रश्‍नी घटनात्मक पीठासमोर सुनावणी सुरु आहे. येत्या “महिला दिनी’ म्हणजे 8 मार्च रोजी होणार असलेल्या या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच सातारचे भाजपा नेते, राज्यसभा सदस्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सर्वपक्षीय नेत्यांना या प्रश्‍नी भेटण्याचा सपाटा लावला होता.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतही मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने उदयनराजे भोसले यांनी चर्चा केली आहे. त्यालाच अनुसरून आता येत्या दोन दिवसात मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने एका बैठकीचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये शरद पवार, देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री शंभूराज देसाई यांचा समावेश असेल. दि. 8 मार्चपासून मराठा आरक्षणाची होणारी दिल्लीतली सुनावणी आणि विधीमंडळाचे अधिवेशन या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होणार आहे, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे.

फलटणचे राजे, आमचे सातारचे राजे, लोकशाहीतले राजे कसली आखणी करतात हे काळ आणि वेळच ठरवेल. जिल्हा बॅंकेची निवडणूक आली आहे म्हणल्यावर थोडेसे इकडे तिकडे होणारच. आमचे तर आहेच, बघू कोण कशी आखणी करतोय, अशा शब्दात जिल्हा बॅंकेच्या अनुषंगाने खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सूचक वक्तव्य करून जिल्हा बॅंकेचे राजकारण ढवळून काढले आहे.

सातारा जिल्ह्याला इतिहास असून, जिल्हा आदर्श होण्याच्या दृष्टीने राज्य पातळीवर शंभूराज व सगळे आमदार चर्चा करतील. परंतु, खासदाराच्या भूमिकेत केंद्रातील जे प्रश्‍न आहेत ते मांडू, असे म्हणत उदयनराजेंनी जिल्हा बॅंक निवडणुकीत आपली भूमिका काय असणार हे अद्याप गुलदस्त्यातच ठेवली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.