बेंगळुरू – पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले ज्येष्ठ कॉंग्रेस सदस्य यु. टी. खदेर यांना कॉंग्रेसने विधानसभेचे अध्यक्ष म्हणून संधी दिली असून त्यांनी आज या पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांची निवड जवळपास निश्चीत मानली जात आहे. ती झाली तर विधानसभेच्या अध्यक्षपदी निवडून येणारे ते पहिले मुस्लिम उमेदवार असतील.
राज्यात 2019-2023 या काळात भाजपची सत्ता असताना विरोधी पक्षाचे उपनेते म्हणून काम करणारे खदेर यांनी आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासोबत सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला.
1 ऑक्टोबर 1969 रोजी जन्मलेले खदेर हे मंगळुरूचे 5 वेळा आमदार आहेत. ते कायद्याचे पदवीधर आहेत. त्यांनी 2013-18 मध्ये या काळात सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आरोग्य तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणून काम केले. त्या आधी जेडीएस-कॉंग्रेस आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृहनिर्माण आणि शहरी विकास खात्यांची जबाबदारी सांभाळली.