बारामती शहर पोलिसांची कामगिरी
बारामती: गावठी बनावटीचे पिस्तुल बाळगल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी दोघांना अटक केली. राजेंद्र सर्जेराव भंडलकर (वय 24, रा. कोऱहाळे बुद्रूक, ता. बारामती) व प्रतीक भालचंद्र शिंदे (वय 25, रा. हरीकृपानगर, इंदापूर रोड, बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 1 लाख 60 हजार रुपये किमतीची दोन पिस्तुले, दोन जीवंत काडतुसे मिळून आली.
याबाबतची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली. पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक पद्मराज गंपले, योगेश शेलार, संदीपान माळी, अोंकार सिताप, पोपट नाळे, राजेश गायकवाड, सिद्धेश पाटील, पोपट कोकाटे, सुहास लाटणे, अंकुश दळवी, दशरथ इंगवले, अजित राऊत, योगेश कुलकर्णी आदींनी ही कामगिरी केली.
शहरामध्ये उपनिरीक्षक योगेश शेलार व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी बारामती-निरा रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना एका होन्डा कंपनीची काळ्या रंगाची शाईन दुचाकी (एमएच-12, एफजे-3330) हिच्यावर एक युवक संशयितरित्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला हात दाखवून थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांना पाहून त्याने दुचाकी भरधाव वेगाने निरा बाजूकडे नेली. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी पाठलाग सुरु केला.
निरा रस्त्यावरील म्हसोबा मंदिराशेजारी भंडलकर याने दुचाकी सोडून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करत त्याला पकडला. नावाची विचारणा केली असता त्याने राजेंद्र सर्जेराव भंडलकर असे नाव सांगितले. त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तुल, त्यात दोन जीवंत काडतुसे मिळून आली. शहरातील हरीकृपानगर भागात राहणाया प्रतिक शिंदे याच्याकडून हे पिस्तुल घेतल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शिंदे याच्या घराची झडती घेतली. तेथेही एक गावठी पिस्तुल मिळून आले.
या दोघांविरोधात भादंवि कलम 269, 270, 188 सह भारतीय हत्यार कायद्यानुसार तसेच साथीचे रोग प्रतिबंधित अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.