मंचर पोलिसांची कामगिरी :पाच मोटरसायकली केल्या हस्तगत, चोरीची दिली कबुली
मंचर – वडगावपीर (ता. आंबेगाव) येथील साहिल सलीम शेख (वय 19) या सराईत चोरट्याला मंचर पोलिसांनी अटक केली आहे.त्याने पाच दुचाकी मोटारसायकल आणि एक इंडिका कार चोरल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती मंचर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांनी दिली. त्याच्याकडून चोरीच्या पाच मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या, असून इंडिका कार लवकरच मिळेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
लोणी येथील साईलीला हॉटेल येथे नाश्ता करायला थांबलेले रहेमान राजू तांबोळी (रा. लोणीमावळा ता. पारनेर) हे हॉटेलमध्ये नाश्ता करत होते. त्यांनी दुचाकी बाहेर लावली होती. नाश्ता करून आल्यावर मोटरसायकल क्रमांक (एमएच 14 सीए 5634) ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरल्याचे लक्षात आले.
यासंदर्भात त्यांनी मंचर पोलीस ठाण्यात गाडी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली. रविवारी (दि. 19) पोलीस कर्मचारी विलास साबळे, योगेश रोडे, एम. डी. भालेकर, प्रशांत भुजबळ, सोमनाथ वाफगावकर, नीलेश खैरे, नवनाथ नाईकडे, शिवाजी चितारे, कृष्णदेव पाबळे आणि विठ्ठल वाघ हे गस्त घालत असताना अवसरी फाट्याजवळ रात्री साडेनऊ वाजता एक अज्ञात दुचाकीस्वार दिसला. त्याला हटकले असता तो गोंधळून गेल्याने पोलिसांचा संशय वाढला. त्याला ताब्यात घेतले असता, तो वापरत असलेले दुचाकी वाहन हे चोरीचे असल्याचे त्याने कबूल केले.
स्वतःचे नाव साहिल सलीम शेख असे सांगितले. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याने चोरीच्या एकूण पाच मोटारसायकलीची कबुली दिली. या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे आणि मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड पुढील तपास करत आहेत.