कोपरगाव – भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचे रविवारी शिर्डी नगरीत जिल्हा संघटनात्मक बैठकीसाठी आगमन झाले असता, भाजप व भाजयुमो कार्यकर्त्यांच्या वतीने दुचाकी रॅली काढून बावनकुळे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दुचाकीला भाजपचे झेंडे लावून व गळ्यात उपरणे घालून शिर्डीतील मुख्य रस्त्यावरून जोरदार घोषणा देत निघालेल्या या रॅलीने वातावरण भाजपमय करून टाकत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. या रॅलीला अभूतपूर्व असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भाजपची जिल्ह्याची संघटनात्मक बैठक प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी शिर्डी येथील साई किमया लॉन्स येथे पार पडली. या बैठकीपूर्वी आ. बावनकुळे यांच्या स्वागतासाठी शिर्डी येथील व्हीआयपी रेस्ट हाऊस येथून साई किमया लॉन्सपर्यंत उत्तर नगर जिल्हा भाजप व भाजयुमोच्या वतीने भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये प्रदेशाध्यक्ष आ. बावनकुळे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी बुलेट चालवत सहभागी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.
या रॅलीच्या अग्रभागी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस व उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, नगर महानगर अध्यक्ष भैय्या गंधे, सरचिटणीस नितीन दिनकर, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस योगेश मैंद, उत्तर सोशल मीडिया संयोजक अमित सोळुंके, प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य किरण बोरुडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष ऍड. श्रीराज डेरे आदी नेते सहभागी झाले होते.
रॅलीचे संपर्कप्रमुख म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. रॅलीचे सुंदर नियोजन करून ती जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली त्याबद्दल बावनकुळे यांनी कौतुक केले. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत शिर्डीनगरी दणाणून सोडली. ही रॅली महामार्गावरून मार्गक्रमण करीत साई किमया लॉन्स येथे पोहोचल्यानंतर तेथे भाजपची जिल्ह्याची संघटनात्मक बैठक झाली.