कराड – सूर्यवंशी मळा, कराड येथील रस्त्यावर ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. विजय पांडुरंग शिंदे (वय 58) रा. मंगळवार पेठ, कराड असे त्यांचे नाव आहे. याबाबत पोलिसात आकस्मित मृत्यू अशी नोंद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सूर्यवंशीमळा येथे नगरपालिकेचे ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. त्यासाठी रस्त्यात मोठे खड्डे खोदलेले आहेत. मंगळवार, दि. 12 रोजी दुपारी तेथील रस्त्यावरून प्रवास करताना विजय शिंदे हे दुचाकीसह त्या खड्ड्यात पडले.
खड्डा खोल असल्याने व त्यात मुरूम असल्याने शिंदे यांच्या डोक्याला मोठा मार लागला. दुचाकीस्वार खड्यात पडल्याचे निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ड्रेनेजचे काम सुरू असताना ठेकेदाराने तेथे कोणतेही बोर्ड न लावल्याने व तीन महिन्यापासून सुरू असलेल्या या कामाकडे पालिकेचे आवश्यक लक्ष नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.