वाई – मेणवली, ता. वाई येथील दिलीप कृष्णा शिखरे (वय 52) यांचा मंगळवारी पहाटेच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाई पोलिसांनी संशयावरून दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मेणवली येथील आंबडेकर चौकाशेजारी राहणारे दिलीप शिखरे हे मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराच्या अंगणात रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे स्थानिक नागरिकांना दिसले. नागरिकांनी पोलीस पाटील संदेश वैराट यांना तात्काळ माहिती दिली. वैराट यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता डोक्यात व चेहऱ्यावर धारदार शस्त्राचे वार झाल्याने शिखरे यांचा मृत्यू झाला होता. पिंपरी-चिंचवड येथे राहत असलेली शिखरे यांची पत्नी, मुले व मुंबई येथे राहणाऱ्या भावास या घटनेची माहिती देण्यात आली.
शिखरे हे गेली अनेक वर्षे मेणवली येथील घरात एकटेच राहत होते. सोमवारी रात्री त्यांनी काही व्यक्तींसोबत जेवण केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांच्या अंगणात उभ्या असलेल्या दोन दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या. त्यानंतर संशयावरून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. शिखरे यांचे वडील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तर भाऊ मुंबईत गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत आहेत.
या खुनाचे कारण समजले नसून पोलीस पाटील संदेश नंदू वैराट (वय 27) यांच्या फिर्यादीवरून वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, उपनिरीक्षक रमेश मोतेकर व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.