पुण्याच्या विकास स्टुडिओचा संकल्प आराखडा ठरला अव्वल
सातारा – छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशातील महान आर्किटेक्ट होते, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत 300 हून अधिक किल्ले बांधले, त्याच धर्तीवर नगरपालिकेच्या अद्ययावत प्रशासकीय इमारतीमुळे शाहूनगरी आयकॉनिक सातारा हे बिरूद सार्थपणे मिरवणार आहे, असे प्रतिपादन उदयनराजे भोसले यांनी केले. दरम्यान, सातारा शहराचा विस्तार पाहता सध्याची इमारत पुरेशी नाही.
त्यामुळे साताऱ्याची ओळख व्हावी, अशी भव्यदिव्य इमारत होईल, यादृष्टीने आयकॉनिक सातारा स्पर्धेतील रेखांकने आली असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. सातारा नगर परिषदेच्या नियोजित प्रशासकीय इमारतीच्या संकल्प रेखांकनासाठी घेण्यात आलेल्या “आयकॉनिक सातारा’ या वास्तू विशारदांच्या देश पातळीवरील स्पर्धेत पुणे येथील आर्किटेक्ट कल्पक भंडारी, जयंत धरप व विनोद धुसिया यांच्या विकास स्टुडिओ या कंपनीला प्रथम क्रमांक मिळाला तर द्वितीय क्रमांक पुण्याच्या डिझाइन कॉडसला व नाशिक येथील कॉज ऍन इनिशिएटिव्ह कंपनीच्या डिझाइनला मिळाला. यावेळी विजेत्यांचा सत्कार सन्मानचिन्ह, धनादेश व पुष्पगुच्छ देऊन माजी खासदार उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहाराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
स्पर्धेतील विजेता, उपविजेता व तृतीय क्रमांकाला स्मृतीचिन्ह व अनुक्रमे रु. अडीच लाख, दीड लाख व एक लाखाचे इनाम दिले गेले. यावेळी विक्रमसिंहराजे भोसले, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, मुख्याधिकारी शंकर गोरे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस्चे महाराष्ट्रचे अध्यक्ष सतिश माने, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, सातारा सेंटरचे अध्यक्ष मयुर गांधी, सेक्रेटरी विपुल साळवणकर, स्पर्धेतील निवड समितीचे सदस्य नामवंत वास्तूविशारद नितीन किल्लावाला, चंद्रशेखर कानेटकर व संजय पाटील, नगरसेवक-नगसेविका, राज्यातून आलेले आर्किटेक्टस्, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्पर्धेतील सर्वोत्तम 12 आराखड्यांचा समावेश असलेले कॉफी टेबल बूकचे प्रकाशन मान्यवरांच्या
हस्ते करण्यात आले.
नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी मनोगत व्यक्त केले. आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष मयूर गांधी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आर्किटेक्ट ययाति टपळे, महेंद्र चव्हाण, विपुल साळवणकर, सुहास तळेकर, सुधीर शिंदे, श्री. महाजनी, उपेंद्र पंडित यांनी मान्यवरांचा सत्कार केला. आर्किटेक्ट सुहास तळेकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे निटनेटके सूत्रसंचालन सौ. स्नेहल दामले यांनी केले. परीक्षकांनी निवडलेल्या निवडक 32 इमारत आराखड्यांचे प्रदर्शन जनतेस पाहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहस्थळी 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत जनतेस पाहण्यासाठी विनामुल्य खुले ठेवले आहे.