शिरूर – शिरूर शहराजवळील बाबुरावनगर व बाफना मळा परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. शनिवार (दि.28) आढळलेल्या बाफना मळा, बाबुराव नगर पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले 27 जणांना क्वारंटाइन केल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
शिरूर शहराजवळील तर्डोबावाडी ग्रामपंचायत हद्दीतील बाफना मळा व बाबुराव नगर येथे दोन करोना बाधित रुग्ण व बाभुळसर बुद्रुक येथील एक रुग्ण व रांजणगाव गणपती दोन रुग्ण, असे एकूण पाच रुग्ण आढळले होते. बाफना मळा येथील रुग्णाच्या संपर्कात आलेले 14 जण, बाबुरावनगर येथील रुग्णाच्या संपर्कात आलेले 13 जण, असे एकूण 27 जण क्वारंटाइन करण्यात आले आहे.
रांजणगाव गणपती येथील दोन करोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. शिरूर तालुक्यात शनिवारी एकाचदिवशी चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शिरूर तालुक्यातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
बाभूळसर बुद्रुकमध्ये पहिला बाधित
मांडवगण फराटा – बाभूळसर बुद्रुक (ता. शिरूर) येथे करोनाचा पहिला रुग्ण आढळला असल्याची माहिती मांडवगण फराटा आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते- इसवे यांनी दिली आहे. त्यामुळे करोनामुक्त झालेल्या शिरूरच्या पूर्व भागात पुन्हा करोनाचा शिरकाव झाला आहे.
बाभुळसर बुद्रुक एक येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 14 जणांना क्वारंटाइन केले आहे. बाभूळसर बुद्रुक येथे करोना पॉझिटिव्ह आढळलेला तरुण गावातून दररोज रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीत ये-जा करत होता.
दरम्यान, त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना होमक्वारंटाइन केले असून तरुणावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन डॉ. मंजुषा सातपुते-इसवे यांनी केले आहे.