देहरादून : उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी जमीन खचल्याच्या घटना समोर येत आहेत. केदारनाथच्या गौरीकुंडमध्ये जमीन खचल्याची घटना घडली असून तीन लहान मुले ढिगाऱ्याखाली दबले गेले. यातील दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर एक मुलगी जखमी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
जमीन खचल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या मुलांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘बुधवारी गौरिकुंड गावात नेपाळी वंशाची तीन मुले जमीन खचल्याने ढिगाऱ्याखाली अडकली. त्यात एक आठ वर्षाची मुलगी स्विटी, पाच वर्षाची मुलगी पिंकी आणि एक लहान मुलगा यांचा समावेश होता.
तिन्ही मुलांना स्थानिक पोलिस, एनडीआरएफ आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्यांना गौरीकुंड रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. स्विटीची प्रकृती ठीक असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तर दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घोषणा डॉक्टरांनी केली आहे. त्यामुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली. जिल्हा आपत्कालीन अधिकारी नंदन सिंह म्हणाले की, दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झालाय, तर एका लहान मुलीला वाचवण्यात यश आले आहे.
उत्तराखंडमध्ये हवामान विभागाने मोठ्या पावसाची शक्यता व्यक्त केली असून अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना सुचित करण्यात आले की, त्यांनी खबरदारी घ्यावी, तसेच हवामान विभागाची अपडेट घ्यावी. तसेच भाविकांना जास्त काळ न भटकण्याचा सल्ला देण्यात आला आहे.