सातारा – “इंडियन सॉफ्ट शेल’ या दुर्मिळ प्रजातीच्या कासवाची तस्करी करून विक्रीच्या प्रयत्नात असणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. मंजुष शिवाजी जगताप (मुळ रा. तुळजापूर, सध्या रा. रामनगर, सातारा) याच्यासह एका अल्पवयीन युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लाखो रुपये किमतीचे कासव हस्तगत केले आहे.
अधिक माहिती अशी, शाहूपुरी चौकातून एक युवक पिशवीतून “इंडियन सॉफ्ट शेल’ या दुर्मिळ प्रजातीच्या कासवाची तस्करी करून ते विक्रीसाठी घेऊन आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली होती. पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांना कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार वाघ यांनी कर्मचाऱ्यांसह शाहूपुरी चौकातून एका संशयित अल्पवयीन युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
त्याच्याकडील पिशवीची झडती घेतली असता त्यात कासव मिळून आले. त्यानंतर त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणल्यानंतर अधिक चौकशी केली असता ते कासव मंजुष जगताप याने त्याच्याकडे दिल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी मंजुष याला रामनगर येथून ताब्यात घेतले. मंजुष याने कासवाची तस्करी करून ते लाखो रुपयांना विक्री करणार असल्याचे सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाने त्या कासवाची पाहणी करून ते कासव “इंडियन सॉफ्ट शेल’ या दुर्मिळ प्रजातीचे असल्याचे स्पष्ट करून जगताप याला पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, जोतीराम बर्गे, हवालदार उत्तम दबडे, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, प्रवीण कडव, केतन शिंदे यांनी केली.