दृश्‍यम स्टाईलने खून करणारे दोघे अटकेत

पैशांच्या वादातून खून केल्याची कबुली : स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

शिक्रापूर/ तळेगाव ढमढेरे – शिक्रापूर (ता. शिरूर) येथून बेपत्ता झालेल्या व्यक्‍तीचा खून करून मृतदेह हातपाय बांधून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पाण्यात टाकून देत दृश्‍यम सिनेमा स्टाईलने खून करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. एक साथीदार फरार झाला आहे.

शिक्रापूर येथील विरोळे वस्ती येथील हनुमंत हुसेन ऐवळे हे तीन ऑक्‍टोबर रोजी बेपत्ता झाले होते. त्याचा शोध शिक्रापूर पोलिसांकडून सुरू होता. (दि.10) ऑक्‍टोबर रोजी लोणीकंद हद्दीमध्ये बुर्केगाव (ता. हवेली) येथील भीमानदीच्या पात्रात बेपत्ता हनुमत याचा मृतदेह आढळला. हनुमंत याचा खून केल्याचे समोर आले होते. गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने समातंर तपास सुरू केला. हनुमंत यांचा खून पैशाच्या वादातून झाल्याचे समोर आले.

त्यानंतर हा खून सोमनाथ भुजबळ व त्याचा मित्र सुमित नरके यांनी केल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय दत्तात्रय गिरमकर, दयानंद लिम्हण, उमाकांत कुंजीर, राजू मोमीन, विजय कांचन, जनार्दन शेळके, सचिन गायकवाड, धीरज जाधव, अक्षय जावळे यांनी सापळा रचून खुनातील संशयित आरोपी सोमनाथ ऊर्फ मुन्ना मारुती भुजबळ (रा. बुधेवस्ती शिक्रापूर) व सुमित नरके (रा. तळेगाव ढमढेरे) यांना कारसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी अजून एका मित्राच्या मदतीने पैशाच्या वादातून हनुमंत याचा खून केल्याचे कबूल केले. दोघांना लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

दरम्यान, बेपत्ता युवकाचा गुन्हा शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केला होता. त्यांनतर मृतदेह लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आढळल्याने प्रथम लोणीकंद पोलीस स्टेशन येथे मयत दाखल करण्यात आले होते. त्यांनतर आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पथकाने आरोपींना अटक करून लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात दिले असताना लोणीकंद पोलीस आरोपी व त्यांची जप्त केलेली कार शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे घेऊन येत तपास तुम्ही करा, असे म्हणून तपासाला टाळाटाळ करत असल्याचे चित्र समोर आले.

Leave A Reply

Your email address will not be published.