उदयनराजे केंद्रात, शंभूराजे राज्यात मंत्री होतील

ना. नरेंद्र पाटील : जनतेला झुलवत ठेवणाऱ्यांना हद्दपार करा

तारळे – उदयनराजे भोसले आणि शंभूराजे देसाई यांना सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची जाण असून उदयनराजे केंद्रात आणि शंभूराजे राज्यात मंत्री होतील, असा विश्‍वास अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान या दोन्ही उमेदवारांना माथाडी कामगारांनी मोठे मताधिक्‍य देण्याचा निर्णय घेतला असून जनतेला झुलवत ठेवणाऱ्या विरोधकांना या निवडणुकीत हद्दपार करा, असे आवाहन त्यांनी केले. सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले आणि पाटण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शंभूराजे देसाई यांच्या प्रचारार्थ तारळे (ता. पाटण) येथे आयोजित कोपरा सभेत ना. नरेंद्र पाटील बोलत होते.

यावेळी उदयनराजे भोसले, आ. शंभूराज देसाई , ऍड. भरत पाटील, सागर राजेमहाडिक, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, समृद्धी जाधव, महेंद्र जाधव, बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ जाधव, सोमनाथ खामकर, माजी जि. प. सदस्य रामभाऊ लाहोटी, शिवदौलत बॅंकेचे व्हा. चेअरमन संजय देशमुख, सरपंच अर्चना जरग, उपसरपंच रामचंद्र देशमुख, सुनील काटकर, माणिक पवार, शंभुराजे युवा संघटनेचे अध्यक्ष अभिजीत पाटील, विजय पवार यांच्यासह भाजप, शिवसेना, व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

नरेंद्र पाटील पुढे म्हणाले, सर्वसामान्य लोकांची कामे कशी मार्गी लागतील, या जिल्ह्याचा विकास कसा होईल हेच एकमेव ध्येय ठेऊन उदयनराजे यांनी अवघ्या तीन महिन्यात खासदारकीचा राजीनामा दिला आहे. शंभूराज देसाई यांनी मतदारसंघात विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे जनता त्यांना पुन्हा आमदार करणार आहे. यावेळेस शंभूराजे यांना उद्धव ठाकरे मंत्री करणार असून त्यांच्या रुपाने जिल्ह्याला पालकमंत्री मिळणार आहे. उदयनराजे केंद्रात आणि शंभूराजे राज्यात मंत्री असतील, असा विश्‍वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांनी विक्रमसिंह पाटणकर, श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली.

उदयनराजे भोसले म्हणाले, पाटण तालुक्‍यातील डोंगरी भागातील लोकांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित होते, त्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याचे काम शंभूराजे यांनी केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पाटण तालुक्‍यात विकासकामे मार्गी लागली असून भाजप सरकारच्या काळात सर्वाधिक विकासकामे झाली आहेत.

शंभूराज देसाई म्हणाले, मी जी आश्‍वासने दिली त्यातील 95 टक्के आश्‍वासने पूर्ण केली आहेत. तारळे भागातून सर्वाधिक मतदान होण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे. जे मला मतदान होईल त्यापेक्षा जास्तच मतदान उदयनराजेंना झाले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.