लोणावळा – पुणे-मुंबई द्रुतगतीवर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाखाली साखरेची पोती घेऊन जाणारा मालवाहू ट्रक उलटून झाला. यामध्ये साखरेच्या पोत्याखाली आडकल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी (दि. 10) सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने साखरेची पोती घेऊन निघालेला ट्रक (के.ए.28 डी 5196) हा चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अमृतांजन पुलाखाली उलटून झाला. यामध्ये पोत्याखाली आडकल्याने एकाचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती समजताच बोरघाट महामार्गचे पोलीस कर्मचारी व अधिकारी, आयआरबीचे पथक, अपघातग्रस्तांच्या मदतीला या संघटनेचे सदस्य, लोकमान्य हॉस्पिटलची यंत्रणा व स्थानिक नागरिकांनी या घटनास्थळावर जात क्रेनच्या सहाय्याने ट्रक व पोती बाजूला केली. आणि मयत व्यक्तीला बाहेर काढले.
द्रुतगतीवरील या अपघातानंतर खालापूर फूडमॉलजवळ (कि.मी. 36) दुसरा अपघात झाला. यामध्ये एका ट्रेलरला मागून दुसऱ्या ट्रेलरने धडक दिली. या अपघातात देखील एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, दोन्ही अपघातातील मृतांची नावांची माहिती पोलिसांकडे उपलब्ध नाहीत. शनिवारी द्रुतगतीवर सकाळच्या सत्रात झालेल्या दोन अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला.