शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) नजीक असलेल्या एका नामांकित अशा कंपनीतील शिक्रापूर येथे राहणाऱ्या दोन कामगारांना कोरोनाची बाधा झाली. दोन कामगारांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
शिक्रापूर नजीक असलेल्या सणसवाडी औद्योगिक वसाहतीतील एका मोठ्या नामांकित कंपनीमध्ये पुण्याहून येणाऱ्या एका कामगाराला काही त्रास जाणवू लागल्याने त्याची तपासणी केली. ११ जून रोजी सदर कामगाराचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांनतर या कामगारांच्या संपर्कातील काही कामगारांना प्रशासनाच्या वतीने क्वारंटाइन करत त्यांचे स्व्याब तपासणी साठी घेतलेले होते. त्यातील कामगारांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी शिक्रापूर येथे राहणाऱ्या दोन कामगारांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
शिक्रापूरसह सदर कंपनीच्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, शिक्रापूर येथे आढळून आलेले दोन कामगार हे मलठण फाटा आणि हिवरे रोड या वेगवेगळ्या परिसरात राहत असून शिक्रापूर ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी औषध फवारणी करण्याचे काम हाती घेण्यात आलेले असून या दोन्ही कामगारांच्या संपर्कात अजून कोणी आले आहे का ? यांची देखील माहिती आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात येत आहे. मात्र पुणे शहरातून येणाऱ्या कामगार व नागरिकांमुळे कोरोनाचा फैलाव होत असल्यामुळे प्रशासनाने याबाबत योग्य निर्णय घ्यावा असे कंपनी कामगारांच्या वतीने बोलले जात आहे.
अठरा जणांना क्वारंटाइन व तपासणी – डॉ. राजेंद्र शिंदे ( तालुका वैद्यकीय अधिकारी )
शिक्रापूर येथे आढळून आलेले कोरोना पॉझिटिव्ह दोन्ही कामगार यापूर्वी क्वारंटाइन केलेले असून यांच्या बरोबरीचे व संपर्कातील एकूण अठरा जणांना क्वारंटाइन केलेले असून त्यांचे स्व्याब तपासणीसाठी घेण्याचे काम सुरु असल्याचे शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी सांगितले आहे.