सातारा – सातार्यात बाँबे रेस्टारंटनजिक असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर एका हॉटेलच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत दोन कार आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली. दरम्यान, घरगुती सिलिंडर गॅसच्या टाक्याचा गॅस इको कारमध्ये गॅस भरताना स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. घटनास्थळी पोलीस व अग्निशामक दल पोहोचले मात्र तोपर्यंत दोन्ही कार आगीत जळून खाक झाल्या होत्या.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान महामार्गावर एका हॉटेलच्या बाजुस असलेल्या रिकाम्या जागेत मोठमोठे आगीचे धूर दिसण्यास सुरुवात झाली. याठिकाणी नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली मात्र दूर कुठून येतोय व का येतोय हे कळण्यास काही मार्ग नव्हता मात्र पत्र्याच्या शेडच्या नक्की आतमध्ये घडते काय ? हे बघण्यासाठी काही नागरिकांनी त्या ठिकाणी गेले असता एक इको कार व त्याच्या बाजूला दुसरी एक नवी कोरी डेमो कार जळत असल्याचे निदर्शनास आले.
काही सतर्क नागरिकांनी फोन करून अग्निशामक दलाला कळवले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यास लवकर मदत मिळाली. घटनास्थळी इंडियन कंपनीच्या गॅसच्या दोन टाक्या पडल्या होत्या. त्यामुळे मोकळ्या शेडच्या मागे काय चालले होते ? एलपीजी गॅसच्या टाक्यामध्ये घरगुती गॅस भरायचं काम सुरू होते का ? यामुळे स्फोट झाला का? अशी चर्चा सुरु होती. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली नव्हती.