पुणे – जिल्हा प्रशासनाने अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली आहे. या यादीनुसार जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या ८१ लाख २७ हजार १९ इतकी आहे. त्यानुसार जिल्ह्यात सर्वात मोठा मतदारसंघ हा चिंचवड असून या मतदारसंघात ५ लाख ९५हजार ४०८ मतदार अहेत. तर सर्वात लहान मतदारसंघ हा पुणे कॅन्टोन्मेट असून या मतदारसंघात २ लाख ६९ हजार ५८८ मतदार आहेत. दरम्यान पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघाचा समावेश होत असून शहरात सर्वांत मोठा मतदारसंघ हा हडपसर असून या मतदारसंघात ५ लाख ६२ हजार १८६ मतदार आहेत.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्ह्याने चांगली कामगिरी केली. जिल्हा निवडणूक प्रशासनाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे मतदार यादीत १ लाख ७५ हजार ५९९ मतदारांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी १ जानेवारी रोजी जिल्ह्याची मतदारसंख्या ७९ लाख ५१ हजार ४२० होती, तर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाआधी २७ ऑक्टोबर २०२३ रोजी ८० लाख ७३ हजार १८३ होती.
प्रशासनाने महिला मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीर, समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी सुट्टीच्या दिवशी शिबिराचे आयोजन, महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांचा सहभाग, गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार नोंदणीची सुविधा, उद्योगसंस्थांचा सहभाग असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याने अंतिम मतदार यादीत मतदारांची संख्या ८१ लाख २७ हजार १९ एवढी झाली आहे.
पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघ
विधानसभा मतदारसंघ – मतदारांची संख्या
वडगावशेरी – ४,५२,६२८
शिवाजीनगर – २,७२,७९८
कोथरुड – ४,०१,४१९
खडकवासला – ५,२१,२०९
पर्वती – ३,३४,१३६
हडपसर – ५,६२,१८६
पुणे कॅन्टोन्मेंट – २,६९,५८८
कसबा पेठ -२,७२,७४७
पिंपरी-चिंचवड शहरातील विधानसभा मतदारसंघ
विधानसभा मतदारसंघ – मतदारांची संख्या
चिंचवड – ५,९५,४०८
पिंपरी -३,६४,८०६
भोसरी -५,३५,६६६
ग्रामीण भागात विधानसभा मतदारसंघ
विधानसभा मतदारसंघ – मतदारांची संख्या
जुन्नर – ३,०८,४३९
आंबेगाव – २,९८,५९८
खेड-आळंदी – ३,४५,०३५
शिरूर – ४,२९,८१८
दौंड – २,९९,२६०
इंदापूर – ३,१८,९२४
बारामती – ३,६४,०४०
पुरंदर – ४,१४,६९०
भोर वेल्हा मुळशी- ३,९७,८४५
मावळ -३,६७,७७९