18 उमेदवार असल्याने दोनची गरज : एका युनिटवर 16 उमेदवारांची नावे
पिंपरी – पिंपरी विधानसभा मतदारसंघात 18 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम) 2 बॅलेट युनिट, 1 कंट्रोल युनिटचा समावेश असेल. त्याशिवाय, प्रत्येक मतदान केंद्रनिहाय 1 व्हीव्हीपॅट मशीन लागणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इंदाणी-उंटवाल यांनी दिली.
पहिल्या बॅलेट युनिटवर 1 ते 16 उमेदवारांची नावे असतील. दुसऱ्या बॅलेट युनिटवर सतराव्या आणि अठराव्या उमेदवाराचे नाव आणि 19 क्रमांकाला नोटाचे (नकाराधिकार) बटण असणार आहे. एकूण 399 मतदान केंद्रांसाठी 798 बॅलेट युनिट लागणार आहे. तर, 80 बॅलेट युनिट राखीव ठेवण्यात येणार आहेत. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 23 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तेव्हा देखील प्रत्येक मतदान केंद्रनिहाय 2 बॅलेट युनिट लागले होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), बहुजन समाज पार्टी आदी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. तर, 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत 17 उमेदवारांनी निवडणूक लढविली. तेव्हा देखील प्रत्येक केंद्रनिहाय 2 बॅलेट युनिट लागले होते. 2009 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय जनता पार्टी, बहुजन समाज पार्टी, जनता दल (धर्मनिरपेक्ष), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आदी पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ताब्यात
पिंपरी विधानसभा निवडणुकीसाठी लागणारे आवश्यक ईव्हीएम मशीन पिंपरी विधानसभा निवडणूक कार्यालयाच्या ताब्यात आल्या आहेत. त्यांचे 11 तारखेला निवडणूक निरीक्षक आणि उमेदवारांसमोर रॅन्डमायझेशन (सरमिसळ) केले जाणार आहे. तर, 14 व 15 तारखेला मतदानासाठी ईव्हीएम मशीन तयार करण्याचे (पूर्वतयारी) काम केले जाईल. पिंपरी विधानसभेचे कामकाज सुरू असलेल्या हेडगेवार भवनाशेजारील बॅडमिंटन हॉलमध्ये ही पूर्वतयारी होईल.
कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण
कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजाबाबत येत्या रविवारी (दि. 13) सकाळी 9 ते दुपारी 1 आणि दुपारी 2 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हे प्रशिक्षण आयोजित केले आहे. तर, 20 तारखेला कर्मचाऱ्यांचे तिसरे प्रशिक्षण, मतदान साहित्य वाटप आणि मतदान केंद्रनिहाय साहित्य पाठविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर 5 कर्मचारी नियुक्त केले जाणार आहे. त्याशिवाय, 10 टक्के राखीव कर्मचारी असणार आहेत.