बारामती – गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 60 हजार रुपये किमतीची दोन पिस्तूल, दोन जीवंत काडतुसे हस्तगत केली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.
राजेंद्र भंडलकर (वय 24, रा. कोऱ्हाळे बुद्रुक, ता. बारामती) व प्रतीक शिंदे (वय 25, रा. बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शहरामध्ये उपनिरीक्षक योगेश शेलार व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी नीरा रस्त्यावर पेट्रोलिंग करताना एका दुचाकीवरून युवक संशयितरित्या फिरताना दिसला.
पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याने दुचाकी वेगाने निरा बाजूकडे नेली. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग सुरू केला. म्हसोबा मंदिराशेजारी भंडलकरने दुचाकी सोडून पळ काढला. पोलिसांनी त्याला पकडला. त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तूल, त्यात दोन जीवंत काडतुसे मिळाली.
हरीकृपानगर भागात राहणाऱ्या प्रतिक शिंदेकडून हे पिस्तूल घेतल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शिंदेच्या घराची झडती घेतली असता तेथेही एक गावठी पिस्तूल मिळून आले.