बोरगाव पोलिसांची कारवाई, दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नागठाणे : कुसवडे, ता. सातारा येथे गांजा लागवड केल्याप्रकरणी अशोक पांडुरंग पवार (रा. कुसवडे) यांच्यावर तर नागठाणे, ता. सातारा येथे गांजा विक्री करणाऱ्या अमोल अण्णा मोहिते (नागठाणे) याच्यावर बोरगाव पोलिसांनी कारवाई केली असून दोघांनाही ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 6 किलो 350 ग्रॅम वजनाचा एक लाख 56 हजार 500 रुपये किंमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
अधिक माहिती अशी, कुसवडे येथे गांजाची लागवड केली असल्याची माहिती बोरगाव पोलिसांच्या डी. बी पथकाला मिळाली होती. त्यानंतर बोरगाव पोलिस ठाण्यातील डी.बी. पथकाने कुसेवडे येथे छापा टाकला असता अशोक पांडुरंग पवार याने त्याच्या घराजवळ गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी अशोक पवार याच्यावर कारवाई करुन 5 किलो 130 ग्रॅम वजनाचा 1 लाख 28 हजार 500 रुपयांच्या गांजासदृश्य वनस्पतीची झाडे जप्त केली असून पवार याला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, दुसऱ्या कारवाईमध्ये अमोल आण्णा मोहिते उर्फ गोंज्या हा नागठाणे गावात त्याच्या घराजवळ गांजाची विक्री करत असल्याची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या डी. बी पथकाने त्याठिकाणी छापा टाकून अमोल मोहिते याच्याकडून 1 किलो 120 ग्रॅम वजन व एकूण 28 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. या दोन्ही कारवाईत एकूण 6 किलो 350 ग्रॅम वजनाचा 1 लाख 56 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा डाळींबकर व पोलीस उपनिरीक्षक राजाराम निकम करत आहेत.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राजाराम निकम, दादा स्वामी, सुनिल कर्णे, पोलीस नाईक दीपक मांडवे, प्रशांत चव्हाण व नम्रता जाधव, पोलीस कॉन्स्टेबल संजय जाधव, दादा माने, पोलीस अधिकारी अंमलदार तसेच श्रीमती सुजाता पाटील, निवासी नायब तहसीलदार व फॉरेन्सीक युनिट, सातारा येथील हवालदार मोहन नाचण, हवालदार रुद्रायण राऊत, पो. कॉ. अमोल निकम व नाकोटीक डॉग युनिट पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धनावडे, डॉग हॅन्डलर पो. कॉ. दत्तात्रय चव्हाण व अंमली पदार्थ शोधक श्वान सुचक हे सहभागी होते.