साताऱ्यात होणार अडीच कोटींची अत्याधुनिक शौचालये

सातारा  – “स्वच्छ भारत’ अभियानात सातारा पालिकेला मिळणाऱ्या निधीवर पदाधिकाऱ्यांच्या उड्या पडल्या आहेत. स्वच्छतेत “लाभाचे विषय’ शोधणाऱ्या पदाधिकारी-कम-ठेकेदारांना अडीच कोटी रुपयांच्या “एअरपोर्ट’ टॉयलेटच्या ठेक्‍याची लॉटरी लागली आहे. सातारा शहरात सात ठिकाणी प्रत्येकी सहा सीटस्‌ची अद्ययावत शौचालये बांधली जाणार असून त्याच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. प्रत्येक शौचालयासाठी 36 लाख 37 हजार 152 रुपये खर्च येणार आहे.

या अडीच कोटींच्या प्रकल्पासाठी नगरसेवकांनी आपल्या मर्जीतील ठेकेदारांची प्यादी पुढे सरकवली आहेत. “स्वच्छ भारत’च्या निमित्ताने शहराची स्वच्छता व पदाधिकाऱ्यांना “लक्ष्मीदर्शन’ असा योग साधला गेला आहे. नवीन शौचालयांमध्ये पुरुषांसाठी तीन कमोड व स्त्रियांसाठी तीन सीटस्‌ असणार आहेत. या टॉयलेटमध्ये वॉश बेसिन, अपंगांसाठी कॉंक्रिटचा रॅम्प, आरसे, हॅंडवॉश, पाण्याची टाकी, केअरटेकर रुम आदी सुविधांचा समावेश आहे.

प्रत्येक शौचालयाची व्यवस्था पाहण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात येणार असल्याने शौचालयाचे नुकसान होणार नाही, असा पालिकेचा दावा आहे. गोडोलीतील भैरोबा मंदिर, दुर्गा पेठेतील तोफखाना, सदाशिव पेठेतील जुनी भाजी मंडई, सोमवार पेठेतील तांबट घराजवळ, बुधवार नाका परिसर, मल्हार पेठेतील भिंगारदिवे घर, या ठिकाणी ही शौचालये बांधण्यात येणार आहेत. “ओडीएफ प्लस प्लस’मध्ये सातारा शहराचा समावेश होण्यासाठी ही शौचालये बांधणे आवश्‍यक आहेत.

त्याचबरोबर नऊ ठिकाणी सध्या असलेल्या शौचालयांची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी 38 लाख 50 हजार 378 रुपये खर्च येणार आहे. करंजे पेठ, सदरबझार, लोणार गल्ली (रविवार पेठ), गुरुवार पेठ, मंगळवार पेठ, मल्हार पेठ व बोगदा या ठिकाणच्या शौचालयांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी साडेतीन ते चार लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी तीन ठिकाणच्या शौचालयांची सहा महिन्यांपूर्वी दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात आली होती. त्यासाठी प्रत्येकी दीड लाख रुपये खर्च करण्यात आला होता. मात्र, “ओडीएफ प्लस प्लस’साठी आलेला निधी जिरवण्यासाठी शौचालय दुरुस्तीच्या नवीन क्‍लुप्ती लढविण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.