नवी दिल्ली -भारताचा अविभाज्य भाग असणाऱ्या लडाखला चीनचा भाग म्हणून दाखवण्याची अक्षम्य चूक ट्विटर या आघाडीच्या सोशल मीडिया कंपनीने केली. त्यावरून भारताने कडक शब्दांत फटकारल्यानंतर ट्विटरने लेखी माफी मागितली आहे.
काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या जिओटॅगिंग फिचरने लडाखला चीनचा भाग म्हणून दर्शवले. त्यावरून सोशल मीडिया युजर्सकडून ट्विटरवर टीकेची झोड उठवण्यात आली. त्यानंतर मागील महिन्यात संसदीय समितीने ट्विटरच्या प्रतिनिधींना पाचारण करून त्यांची कानउघाडणी केली. त्यामुळे ताळ्यावर आलेल्या ट्विटरने संसदीय समितीला प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात लेखी माफीनामा सादर केला. चालू महिन्याच्या अखेरपर्यंत चूक दुरूस्त करण्याची ग्वाही ट्विटरकडून देण्यात आल्याची माहिती संसदीय समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी लेखी यांनी बुधवारी दिली.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय साहनी यांनीही ट्विटरला खरमरीत शब्दांतील पत्र पाठवले. भारताशी संबंधित संवेदनशील बाबींचा आदर केला जावा. भारत कधीच आपल्या सार्वभौमत्वाचा आणि अखंडत्वाचा अनादर सहन करणार नाही, असे त्यांनी पत्रातून स्पष्ट केले होते. भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे ट्विटरला माफी मागावी लागली.