वॉशिंग्टन- अमेरिकेत अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूका अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात सुरक्षित निवडणुका होत्या, असे म्हणणाऱ्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला ट्रम्प प्रशासनाने तडकफडकी काढून टाकले आहे. या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा दावा ट्रम्प प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.
ट्रम्प यांनी मतमोजणीदरम्यान काही राज्यांमधील मतमोजणी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राहिली नसल्याचा आरोप करून फेरमोजणीची मागणी केली होती. त्यांनी यासाठी सर्वोच्च न्यायालयांमध्ये याचिकाही दाखल केल्या होत्या. मात्र त्यांच्या दाव्यामध्ये कोठेही पुरावा आढळला नाही. त्यामुळे फेरमतमोजणीची मागणी फेटाळली गेली.
याच काळात सायबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी एजन्सीचे संचालक ख्रिस्तोफर क्रेब्स यांनी अध्यक्षपदाची निवडणूक अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात सुरक्षित निवडणूक होती, असे वक्तव्य केल्याने ट्रम्प प्रशासनाने ख्रिस्तोफर क्रेब्स यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले आहे.
दरम्यान ट्रम्प यांनी ज्या राज्यांमधील मतमोजणीवर शंका उपस्थित केली होती, त्यातील् महत्वाच्या पेनसिल्वेनियाबाबतचा दावा ट्रम्प प्रशासनाने बुधवारी मागे घेतला. या प्रांतातील निकालाच्या आधारेच बायडेन यांना विजयी घोषित करण्यात आले होते. पेनसिल्वेनियाच्या फेरमतमोजणीचा निकाल मिळेपर्यंत बायडेन यांना विजयी घोषित करणारे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, अशी मागणी ट्रम्प यांनी केली होती.