- लघुउद्योग संघटनेकडून निर्णयाचे स्वागत
- अनेक ठप्प पडलेले उद्योग पुन्हा होणार सुरू
पिंपरी – पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे. करोना रुग्णसंख्येत घट झाल्याने, ऑक्सिजनची मागणी कमी झाली असून, एकूण उत्पादनापैकी 20 टक्के ऑक्सिजन आता उद्योगांना औद्योगिक वापराकरिता उपलब्ध करुन देण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. यामुळे ठप्प पडलेल्या अनेक लघु आणि सूक्ष्म उद्योगांना खऱ्या अर्थाने प्राणवायू मिळणार आहे. उद्योगांना ऑक्सिजन मिळावे, यासाठी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने पाठपुरावा केला होता आणि बंद पडलेल्या उद्योगांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती देऊन वैद्यकीय वापरानंतर उर्वरित ऑक्सिजन उद्योगांना देण्याची आग्रही मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून या निर्णयाचे पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने स्वागत केले आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत करोनाबाधितांची संख्या वाढू लागली होती. अत्यवस्थ बाधितांवरील उपचारांकरिता ऑक्सिजनची नितांत गरज भासू लागल्याने उद्योगांना ऑक्सिजन वापराकरिता मनाई करण्यात आली होती. दीड महिन्यांपूर्वी घेतलेल्या या निर्णयाचा पिंपरी-चिंचवड एमआयडीसीमधील सुमारे 50 टक्के लघुउद्योगांना फटका बसला होता. परिणामी उत्पादन प्रक्रियेशी निगडीत असलेली लघुउद्योग साखळी बंद पडल्याने अर्थकारणाला खीळ बसली होती. तर काही दिवसांपासून करोनाची दुसरी लाट ओसरल्याने रुग्णसंख्या घटत असल्याने वैद्यकीय वापराकरिता ऑक्सिजनची मागणी घटल्याने शिल्लक राहणारा अतिरिक्त ऑक्सिजन उद्योगांना पुरविण्याची आग्रही मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे व अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे केली होती.
ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी पूर्ण क्षमतेने जास्तीत जास्त ऑक्सिजन उत्पादन निर्मिती करावी. उत्पादित केलेल्या एकूण ऑक्सिजन पैकी 80 टक्के वापर हा मेडीकल ऑक्सिजन वापरासाठी करण्यात येऊन त्याचा पुरवठा रुग्णालयाना करण्यात यावा. तसेच उर्वरीत ऑक्सिजनपैकी 20 टक्के वापर हा औद्योगिक प्रयोजनासाठी करण्यात यावा. यामध्ये प्रथम प्राधान्य रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येऊन त्यानंतर औद्योगिक प्रयोजनासाठी पुरवठा करण्यात यावा. कोविड- 19 विषाणू प्रादुर्भावाचे अनुषंगाने आवश्यकता भासल्यास औद्योगिक प्रयोजनासाठी वळविण्यात आलेला 20 टक्के ऑक्सिजनचा वापर हा रुग्णालयासाठी पुरविण्यात येईल. औद्योगिक प्रयोजनासाठी 20 टक्के ऑक्सिजनचा वापर करण्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती पुण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त सुरेश पाटील यांनी दिली आहे.
रुग्णसंख्या घटल्याने मागणी घटली
पुणे जिल्ह्यामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढत असताना 363 मॅट्रिक टन एवढ्या ऑक्सिजनची आवश्यकता लागत होती. आता रुग्ण संख्येत घट झाल्यामुळे 190 मॅट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. जिल्हयात दैनंदिन 355 मॅट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन होत आहे. तसेच पुणे विभागाबाहेरील ऑक्सिजनच्या मागणीतही घट झाली आहे. हवेतून ऑक्सिजन काढणाऱ्या विविध प्लॉन्टमधून 20 टक्के ऑक्सिजन मिळत आहे. त्यामुळे करोनाच्या काळात औद्योगिक चक्र सुरु राहावे यासाठी 20 टक्के ऑक्सिजन औद्योगिक क्षेत्रासाठी देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ही माहिती प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
ऑक्सिजनबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. प्रशासनाने सध्या उत्पादित होत असलेला ऑक्सिजन आणि वैद्यकीय गरज यांचा अभ्यास करुन गरजेपेक्षा अधिक ऑक्सिजन राखीव ठेवावा. तरीही 20 टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन शिल्लक राहू शकेल. तो उद्योगांना देण्यात यावा.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना