आळेफाटा – वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथे ओढ्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी (दि. 14) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
साहील राजू लोखंडे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. गोरक्ष मारुती लोखंडे (वय 25) यांनी या बाबतची माहिती पोलिसांना दिली. पिंपळगाव जोगा कालव्याचे आवर्तन सुरू असून या कालव्याद्वारे वडगाव आनंद गावातील एका ओढ्यात पाणी सोडण्यात आले आहे. साहील त्याच्या मित्रांसोबत या ओढ्यात पोहण्यासाठी गेला होता.
त्याचवेळी तो बुडू लागल्यामुळे त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. त्यावेळी बाजूला असलेल्या नागरिकांनी साहील यास पाण्याबाहेर काढले व त्यास तात्काळ उपचारासाठी आळेफाटा येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पुढील तपास आळेफाटा पोलीस करीत आहेत.