सातारा -जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये नऊ करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी बुधवारी दिली. बाधितांचे प्रमाण सातत्याने घटत असतानाही करोनाबळी रोखण्यात अपयश येत असल्याने जिल्हावासीयांची चिंता कायम आहे. जिल्ह्यातील करोनाबळींचा एकूण आकडा 1518 झाला आहे.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवार पेठ, सातारा येथील 50 वर्षीय पुरुष, पिंपोडे, ता. कोरेगाव येथील 90 वर्षीय महिला, खेड, ता. कोरेगाव येथील 80 वर्षीय महिला, जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये बेलवडे बुद्रुक, ता. कराड येथील 70 वर्षीय महिला, वाठार, ता. कराड येथील 80 वर्षीय पुरुष, नागझरी, ता. सातारा येथील 73 वर्षीय पुरुष, कुमठे, ता. कोरेगाव येथील 60 वर्षीय पुरुष, बिदाल, ता. माण येथील 75 वर्षीय पुरुष, रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील 80 वर्षीय पुरुष, अशा नऊ कोविडबाधितांचा मृत्यू झाला.
555 नागरिक करोनामुक्त
जिल्ह्यातील रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतलेल्या 555 नागरिकांना बुधवारी घरी सोडण्यात आले असून, 316 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. सातारा येथील जिल्हा रुग्णालयातील 14, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 13, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 14, कोरेगावातील 34, वाईतील 16, खंडाळ्यातील 19, रायगाव येथील 31, पानमळेवाडीतील 36, मायणीतील आठ, महाबळेश्वरमधील 20, पाटण येथील 29, खावलीतील 23, तळमावलेमधील सहा व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 53, अशा एकूण 316 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.