पुणे जिल्हा: विषारी पाण्याने 20 बकऱ्यांचा मृत्यू

कुरकुंभ एमआयडीसीत घटना : 60 बकऱ्यांना विषबाधा

कुरकुंभ -दौंड तालुक्‍यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत रस्त्याच्या बाजूला साचलेले विषारी रासायनिक पाणी पिऊन वीसपेक्षा अधिक मेंढ्या मृत्युमुखी पडल्या तर साठ ते सत्तर बकऱ्यांना विषबाधा झाली आहे. ही घटना बुधवारी (दि.28) घडली आहे. एकीकडे स्फोट आणि आगीच्या तोंडाशी असलेल्या गावकऱ्यांबरोबर मुक्‍या प्राण्यांचा जीव हकनाक जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्‍त होत आहे.

पाटस गावातील मोटेवाडा येथील बरकडे कुटुंब एक हजार मेंढ्या घेऊन कुरकुंभमार्गे नाशिकच्या दिशेने चालले होते. पुुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांची संख्या जास्त असल्याने मेंढपाळांनी हा कळप पर्यायी औद्योगिक वसाहतीच्या रस्त्याने जात होता. यावेळी औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यालगत कंपन्यांचे विषारी सांडपाणी उघड्यावर सोडले होते. कळपातील काही बकऱ्यांनी विषारी सांडपाणी पिले.

त्यानंतर थोड्या अंतरावर जाताच कळपातील सुमारे दहा ते बारा मेंढ्या जागीच तडफडू लागल्या. त्यानंतर बरकडे यांना हा प्रकार लक्षात आला. सायंकाळपर्यंत 20 बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. साठ ते सत्तरपेक्षा अधिक बकऱ्यांना विषबाधा झाल्याचे मेंढपाळ रामा शिवा बरकडे व आबा बाबू बरकडे यांनी सांगितले. हा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता त्यांनी व्यक्‍त केली.

यावेळी खासगी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विषबाधा झालेल्या बकऱ्यांची तपासणी केली आहे. कुरकुंभ परिसरात बरकडे कुटुंबाचा फिरता वाडा आहे. ते दौंडमार्गे पुढे जाणार होते. घटनास्थळी धाव घेत दौंड ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, कुरकुंभ पोलीस स्टेशनचे जमादार के. बी. शिंदे, पंडित, मांजरे, दत्तात्रय चांदणे, ए. एस. राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.