अंकारा – तुर्कीयेच्या दक्षिणेकडील भागाला आज पुन्हा एकदा 5.6 रिश्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का जाणवला. विनाशकारी भूकंपाच्या तीन आठवड्यांनंतर जाणवलेल्या या भूकंपामध्ये आणखीन काही इमारतींचे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एका इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एक व्यक्ती आणि त्याची कन्या गाडली गेल्याचे समजले असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
आज झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू मलात्या प्रांतातील यासिलर्त शहराजवळ होता, असे तुर्कीयेच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेने म्हटले आहे. याच शहरातील काही इमारती पडल्याचे शहराच्या महापौरांनी सांगितले. यातील एका इमारतीचे पूर्वीच्या भूकंपात नुकसान झाले होते.
तेथे पूर्वी रहात असलेले रहिवासी अन्यत्र विस्थापित झाले आहेत. मात्र आपले काही सामान नेण्यासाठी पिता पुत्री या इमारतीमध्ये गेले असताना पुन्हा आलेल्या भूकंपात ही इमारत कोसळली आणि ढिगाऱ्याखाली दोघेही गाडले गेले. अन्यत्र काही इमारती कोसळल्या असून तेथेही बचाव आणि मदत पथक रवाना झाले आहे.
मृतांचा आकडा 50 हजारांच्या पुढे…
दरम्यान तुर्कीये आणि सीरियाच्या सीमाभागात 6 फेब्रुवारीला झालेल्या विनाशकारी भूकंपात मरण पावणाऱ्यांची संख्या आता 50 हजारांच्यापुढे गेली आहे. तुर्कीये आणि सीरिया या दोन्ही देशात मिळून 1 लाख 73 हजार इमारती कोसळल्या आहेत. 6 फेर्बुवारीच्या भूकंपानंतर आतापर्यंत तब्बल 10 हजार आफ्टरशॉक जाणवले असल्याचे तुर्कीयेतील आपत्ती व्यवस्थापन संस्तेने म्हटले आहे.