शारदा प्रांगण वैष्णवांच्या गर्दीने फुलले : “ज्ञानोबा- तुकोबांचा जागर
प्रमोद ठोंबरे/दिगंबर पडकर
बारामती/ जळोची –जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती शहरामध्ये “ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. स्वच्छ, सुंदर, हरित बारामतीनगरीत संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शारदा प्रांगणात मुक्कामासाठी विसावला. विरोधी पक्षनेते अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती शहराच्या वेशीवर पालखीचे स्वागत केले.
पाटस रोडवरील देशमुख चौकात बारामतीकर व प्रशासनाच्या वतीने पालखी रथ आणि दिंड्यांचे स्वागत केले. यावेळी अजित पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, एन्व्हार्यरमेंटल फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, बारामती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बारामती शहरात चौकाचौकात विविध संस्था संघटनांकडून पालखी रथाचे व दिंड्याचे स्वागत करण्यासाठी मंडप उभारले आहेत. काही सेवाभावी संस्थांकडून वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा, अल्पोपहार, फळे, पाणीपुरवठा व इतर सेवा पुरवण्यात येत आहेत. सर्व वातावरण हरीभक्तांनी गजबजून गेले आहे. शारदा प्रांगण व नगरपरिषद परिसरात वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पालखी मार्गावरील सर्व रस्त्यांची स्वच्छता केली आहे. निर्मल वारीअंतर्गत शहरात विविध ठिकाणी 1000 सीट फिरते शौचालयाची सोय केली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करून शहरात धूर फवारणी केली आहे. स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत शहरात प्लॅस्टिकमुक्त बारामती, प्रदूषण मुक्तवारी व पर्यावरण हरित संतुलनासाठी उपक्रम राबविले. कचरा कुंडी, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, सूचना फलक अशी व्यवस्था केली आहे.
आज इंदापूर तालुक्यात मुक्काम
संत तुकोबा महाराजांचा पालखी सोहळा बारामतीतील मुक्कामानंतर पालखी सोहळा सोमवार (दि.19) इंदापूर तालुक्यात प्रवेश करणार आहे. त्यापूर्वी बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे परंपरेनुसार मेंढ्यांचे रिंगण पार पडेल. त्यानंतर पालखी सोहळा मार्गस्थ होईल. सोहळ्याच्या पाठीमागे बारामती नगर परिषदेचे 175 कर्मचारी स्वच्छतेसाठी कार्यरत होते. त्यामुळे पालखी सोहळा पुढे गेल्यानंतर पाठीमागे कोणत्याही प्रकारची अस्वच्छता दिसून येत नव्हती. रस्ते, चकाचक दिसत होते. मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे व त्यांच्या टीमने स्वच्छतेबाबतची दक्षता घेतल्याने पालखी 16 पुढे गेल्यानंतर पाठीमागेही बारामतीचे रस्ते स्वच्छ राहिले.