Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. आज १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९६ लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नगर, शिर्डी आणि बीड अशा अकरा जागांवर मतदान होणार आहे. अशात या टप्पात दिग्गज उमेदवारांचे भविष्य ठरणार आहे. यासाठी आता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
राज्यात देखील अनेक नेते मंडळींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. रावेरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील आणि अहमदनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी देखील मतदान केले आहे. यानंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड येथे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी मतदान केले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये तिहेरी लढत Lok Sabha Election 2024|
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील आणि संदिपान भूमरे यांच्यात सामना होणार आहे. चंद्रकांत खैरे याआधी चार वेळा या मतदारसंघातून खासदार राहिलेले आहेत. मात्र २०१९मध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी खैरे यांचा पराभव केला होता. त्यावेळी वंचितच्या तिकीटावर इम्तियाज जलील निवडणूक लढले होते. मात्र यंदा ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर यावेळी सोबत नसल्याने निवडणूक वेगळी ठरण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे, महायुतीकडून संदिपान भूमरे यांना उमेदवारी दिली आहे. पहिल्यांदाच या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. दरम्यान, आज मतदान पार पडल्यावर या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.