निलेश लंकेंनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले “ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती”

Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज सोमवारी 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 96 लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. तर राज्यातील 11 लोकसभेच्या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड लोकसभेच्या जागांवर मतदान होणार आहे. यात अनेक दिग्गज नेत्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियाला सुरुवात झाली असून अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी हांगे या गावात आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी निवडणुकीत अमाप पैसा आणि प्रशासनाचा दुरूपयोग करण्यात आला असल्याचा आरोप केला आहे.
तसेच ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असून ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतले आहे त्यामुळे आपल्या विजयावर शिक्कामोर्तब झाले, असा विश्वास नीलेश लंके यांनी व्यक्त केला.





