नवी दिल्ली – भारताच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज राजघाटावर सपत्निक जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीवर आदरांजली वाहिली. अमेरिकेची जनता सुंदर आणि सार्वभौम भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. महात्मा गांधी हे महान नेते होते. त्यांच्या समाधीला भेट देणे हा एक महत्वाचा सन्मान आहे असे ट्रम्प यांनी तेथील नोंदवहीत लिहीले आहे. या संदेशावर त्यांच्या पत्नी मेलेनिया यांनीही स्वाक्षरी केली.
या दाम्पत्याने महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्पचक्रही वाहिले. राष्ट्रपती भवनावर झालेल्या औपचारीक स्वागत समारंभानंतर ट्रम्प दाम्पत्य राजघाटावर गेले. त्यावेळी त्यांच्या समवेत केंद्रीय मंत्रि हरदीप पुरी हेही होते. या आधी काल ट्रम्प यांनी साबरमती येथील गांधी आश्रमालाही भेट दिली होती.