तृणमुल नेत्याच्या घरात ईव्हीएम घेऊन जाणारा निलंबीत

उलूबेरिया – तृणमुल कॉंग्रेसच्या हावडा जिल्ह्यातील एका स्थानिक नेत्याच्या घरात चार ईव्हीएम म्हणजेच इलेक्‍ट्रॉनिक वोटिंग मशिन्स आणि चार व्हीव्हीपॅट घेऊन जाणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याला निलंबीत करण्यात आले आहे. तुलसीबेरिया गावात हा प्रकार घडला. हा भाग उलूबेरिया विधानसभा मतदार संघाच्या हद्दीत येतो. गावातील तृणमुल कॉंग्रेस नेत्याच्या घराबाहेर निवडणूक आयोगाचा स्टीकर लावलेली गाडी दिसून आल्यानंतर तेथील काही कार्यकर्त्यांनी त्या घरासमोर जमून निदर्शने केली. त्यानंतर वरीष्ठांनी घटनास्थळी धाव घेऊन ही कारवाई केली.

तथापि ज्या चार ईव्हीएम मशिन्स त्या घरात सापडल्या आहेत त्या आजच्या मतदान प्रक्रियेत वापरण्यात येणार नव्हत्या असा खुलासा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणात संबंधीत कर्मचाऱ्यांनी खुलासा करताना सांगितले की आम्ही ही मशिन्स घेऊन गावातील मतदान केंद्रावर रात्री पोहचलो त्यावेळी हे मतदान केंद्र बंद होते. त्यामुळे आम्ही त्या रात्री आमच्यापैकी एकाच्या नातेवाईकाच्या घरी जाऊन मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला त्या रात्री दुसरीकडे कोणतीच सुरक्षित जागा सापडली नाही त्यामुळे आमच्यापुढे कोणताही पर्याय नव्हता असे त्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. तृणमुलच्या नेत्यांकडून निवडणूक गैरव्यवहार करण्यासाठीच या मशिन्स तेथे नेल्या जात होत्या असा आरोप भाजपने केला आहे पण तृणमुल नेत्यांनी तो फेटाळून लावला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.