पुणे – लोहगाव विमानतळावरील प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले ट्रॅव्हिलेटर सुरू झाले आहे. तर दुसऱ्या ट्रॅव्हिलेटरचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच प्रवाशांच्या सोयीसाठी ते सज्ज होईल. त्यामुळे विमानतळावरून एरोमॉलकडे कॅब पकडण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची पायपीट आता कमी होणार आहे.
लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज 190 पेक्षा जास्त विमाने उड्डाण करतात. तर दररोज 26 ते 28 हजार प्रवासी येथून प्रवास करतात. हिवाळ्यामध्ये प्रवाशांची संख्या आणखीन वाढते. दरम्यान, विमानतळ परिसरातील ओला-उबेरचे पार्किंग बंद करून त्या सर्व गाड्या एरोमॉलच्या पार्किंगमध्ये हलविण्यात आल्या आहेत. त्यामुळे विमानतळातून बाहेर पडल्यानंतर एरोमॉलला जाण्यासाठी एक्सलेटर, लिफ्ट किंवा जिण्याने जाता येते.
मात्र तेथून पुढे फुटब्रीजवर साधारण दोनशे मीटर चालावे लागते. त्यात एका ठिकाणी चढ असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांची दमछाक होते. कार्ट कारची सोय आहे परंतू, बहुतांश जणांस अवजड बॅगा ट्रॉलीमध्ये घेऊन जावे लागते. पण, आता प्रवाशांचा हा त्रास कमी झाला आहे.
पादचारी पुलावरून एरोमॉलच्या मल्टीलेव्हल पार्किंगकडे जाताना सरळ मार्ग असलेल्या भागात विमानतळ प्राधिकरणाने ट्रॅव्हिलेटर बसविण्याचे काम हाती घेतले असून, एका ट्रॅव्हिलेटर सुरू झाला असून, दुसऱ्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. येत्या काही दिवसात हा ट्रॅव्हिलेटरही सुरू होईल, असे विमान प्रशासनाकडून सांगण्यात आहे. त्यामुळे प्रवाशांची पायपीट कमी होणार असून, त्यांना दिलासा मिळणार आहे.